Home » Uncategorized » पाचगणीतील दोन बड्या हॉटेल्सचे अन्न विक्री परवाने निलंबित!

पाचगणीतील दोन बड्या हॉटेल्सचे अन्न विक्री परवाने निलंबित!

Facebook
X
WhatsApp

लहू चव्हाण, पाचगणी.

पाचगणीतील दोन बड्या हॉटेल्सचे अन्न विक्री परवाने निलंबित!
एफडीएच्या विशेष पथकाची पाच हॉटेल्सवर अचानक धाड; मुदतबाह्य अन्नपदार्थ आढळल्याने कारवाई, अन्य तीन हॉटेल्सना नोटिसा

पाचगणी, ता. २० (प्रतिनिधी) : पर्यटकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या हॉटेल व्यावसायिकांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कारवाईचा बडगा उगारला आहे. एफडीएच्या विशेष पथकाने पाचगणी शहरातील पाच नामांकित हॉटेल्सवर अचानक छापे टाकून त्यांच्या रेस्टॉरंट व किचनची सखोल तपासणी केली. या तपासणीत दोन हॉटेल्समध्ये स्वच्छतेबाबत गंभीर त्रुटी आढळण्याबरोबरच मुदतबाह्य अन्नपदार्थही आढळून आले. त्यामुळे या दोन्ही हॉटेल्सचे अन्न विक्री परवाने ठरावीक कालावधीसाठी निलंबित करण्यात आले आहेत. तर अन्य तीन हॉटेल्समधील स्वच्छतेबाबत अनियमितता आढळल्याने त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे पाचगणीतील हॉटेल व्यावसायिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
तुकाराम मुंडे यांच्या आदेशानुसार सातारा येथील अन्न व औषध प्रशासन विभागाच्या विशेष पथकाने पाचगणी शहरातील पाच मोठ्या हॉटेल्सना अचानक भेट देत त्यांच्या रेस्टॉरंट आणि स्वयंपाकघरांची तपासणी केली. या मोहिमेदरम्यान हॉटेलमधील स्वच्छता, अन्नपदार्थांची साठवणूक, खाद्यपदार्थ तयार करण्याची पद्धत, तसेच अन्नसुरक्षा नियमांचे पालन केले जात आहे की नाही, याची बारकाईने पाहणी करण्यात आली.
या तपासणीत राभा कृष्ण फूड कोर्ट (शॉपिंग सेंटर, पाचगणी) आणि समर प्लाझा (खिंगर रोड) या दोन हॉटेल्समध्ये स्वच्छतेबाबत गंभीर त्रुटी आढळून आल्या. याशिवाय मुदतबाह्य अन्नपदार्थही आढळल्याने प्रशासनाने या प्रकाराची गंभीर दखल घेत दोन्ही हॉटेल्सचे अन्न विक्री परवाने ठरावीक कालावधीसाठी निलंबित केले आहेत. अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन झाल्याचे तपासणीत स्पष्ट झाल्याने ही कारवाई करण्यात आली.
दरम्यान, क्लिफ इन (नारायण लॉज परिसर), ब्लू कंट्री (खिंगर रोड) आणि फ्रेंच ट्रीट (शॉपिंग सेंटर) या अन्य तीन हॉटेल्समध्येही स्वच्छतेबाबत अनियमितता आढळून आली. त्यामुळे संबंधित हॉटेल व्यवस्थापनांना अन्न व औषध प्रशासन विभागाकडून नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
अन्न व औषध प्रशासन विभागाचे उपायुक्त संजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. या पथकात पी. एन. वायकर, ए. ए. गायकवाड आणि सायली खपाने या महिला अधिकाऱ्यांसह विभागातील अन्य कर्मचारी सहभागी झाले होते. पथकाने विविध हॉटेल्सची पाहणी करून अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर आवश्यक ती कारवाई केली.
पाचगणी हे निसर्गरम्य पर्यटनस्थळ असण्याबरोबरच देश-विदेशातील विद्यार्थ्यांचे महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र म्हणूनही ओळखले जाते. वर्षभर येथे पर्यटकांची मोठी वर्दळ असते. विशेषतः पर्यटन हंगाम, सुट्ट्या आणि सणासुदीच्या काळात हॉटेल्स व रेस्टॉरंटमध्ये खाद्यपदार्थांची मोठ्या प्रमाणावर विक्री होते. अशा परिस्थितीत पर्यटक आणि स्थानिक नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित व दर्जेदार अन्न मिळणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र, काही हॉटेल्समध्ये स्वच्छतेच्या नियमांकडे दुर्लक्ष होत असल्याचे या कारवाईतून समोर आले आहे.
महाबळेश्वरपाठोपाठ आता पाचगणीतही एफडीएने कारवाईचा धडाका लावल्याने हॉटेल व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. या मोहिमेमुळे हॉटेलमधील स्वच्छता, अन्नपदार्थांची गुणवत्ता, साठवणूक आणि मुदत याबाबत अधिक दक्षता घेण्याची गरज अधोरेखित झाली आहे. पर्यटकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अन्नसुरक्षा नियमांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी अशा तपासणी मोहिमांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
5 1 vote
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Are You Satisfied Panchgani Prime Time ?

Latest News