पाचगणी : निसर्गसौंदर्याबरोबरच स्वच्छतेची ओळख जपणाऱ्या पर्यटननगरी पाचगणीने राष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकदा आपल्या यशाचा झेंडा फडकवला आहे. केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत ‘सुपर स्वच्छ लीग २०२५-२६’मध्ये उल्लेखनीय कामगिरी करत पाचगणी गिरिस्थान नगरपरिषदेने मानाचा राष्ट्रीय पुरस्कार पटकावला आहे. विशेष म्हणजे, सातत्यपूर्ण स्वच्छता कामगिरीच्या बळावर पाचगणीने पुरस्कारांचा चौकार मारत राष्ट्रीय स्तरावर आपले मानाचे स्थान अधोरेखित केले आहे. नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात आयोजित दिमाखदार सोहळ्यात महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नगराध्यक्ष दिलीपभाऊ बगाडे,आघाडी अध्यक्ष शेखर कासुर्डे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या राष्ट्रीय गौरव सोहळ्याला नगरसेवक गणेश कासुर्डे, नगरपरिषदेचे शहर समन्वयक ओंकार ढोले उपस्थित होते.
केंद्र सरकारने स्वच्छ सर्वेक्षणामध्ये सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शहरांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘सुपर स्वच्छ लीग’ ही विशेष श्रेणी सुरू केली आहे. स्वच्छ सर्वेक्षण २०२५ पासून या श्रेणीचा समावेश करण्यात आला. २०२१ ते २०२४ या चार वर्षांतील स्वच्छतेच्या कामगिरीचा आढावा घेऊन शहरांना या लीगमध्ये स्थान देण्यात आले. यंदा या स्पर्धेचे निकष अधिक कठोर करण्यात आले होते. लीगमधील आपले स्थान कायम राखण्यासाठी एकूण गुणांपैकी किमान ८५ टक्के गुण मिळवणे आवश्यक होते. पाचगणी नगरपरिषदेने हे आव्हान यशस्वीरीत्या पेलत ८५ टक्क्यांहून अधिक गुण मिळवून आपली गुणवत्ता पुन्हा एकदा सिद्ध केली.
विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे, २० हजारांपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरांच्या गटात पाचगणीने स्वच्छ सर्वेक्षण २०२५ मध्ये देशात प्रथम क्रमांक पटकावला होता. घनकचरा व्यवस्थापन, नियमित स्वच्छता, कचऱ्याचे योग्य संकलन व विलगीकरण, सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता तसेच पर्यटनस्थळांचे नैसर्गिक सौंदर्य अबाधित राखण्यासाठी नगरपरिषदेने विविध प्रभावी उपक्रम राबविले. अधिकारी, कर्मचारी, स्वच्छता सेवक आणि नागरिक यांच्या सामूहिक सहभागातून स्वच्छतेची ही चळवळ अधिक व्यापक आणि परिणामकारक बनली.
नगराध्यक्ष दिलीपभाऊ बगाडे, श्री घाटजाई शहर विकास आघाडीचे सर्व नगरसेवक आणि मुख्याधिकारी पंडित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छतेची ही मोहीम सातत्याने आणि नियोजनबद्ध पद्धतीने राबविण्यात आली. लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि नागरिक यांच्या समन्वयातून मिळालेले हे यश पाचगणीच्या सामूहिक प्रयत्नांचे फलित ठरले आहे.
‘या पुरस्काराचे खरे मानकरी पाचगणीकर नागरिक आहेत. नागरिकांच्या सक्रिय सहकार्यामुळेच शहराची स्वच्छतेची परंपरा टिकवून ठेवणे शक्य झाले. हा सन्मान केवळ नगरपरिषदेचा नसून संपूर्ण पाचगणी शहराचा आहे,’ अशी भावना नगराध्यक्ष दिलीपभाऊ बगाडे यांनी व्यक्त केली.
राष्ट्रपतींच्या हस्ते प्राप्त झालेल्या या राष्ट्रीय सन्मानामुळे पाचगणीच्या स्वच्छता चळवळीला नवी ऊर्जा आणि प्रेरणा मिळाली आहे. निसर्गसौंदर्य, स्वच्छता आणि पर्यटन यांचा सुंदर समन्वय साधणाऱ्या पाचगणीने पुन्हा एकदा देशाच्या नकाशावर आपला वेगळा ठसा उमटवला असून, या यशामुळे संपूर्ण पाचगणीकरांची मान अभिमानाने उंचावली आहे.