Home»Uncategorized»
जिल्हा परिषदेचा वचपा जिल्हा बँकेत! राष्ट्रवादी-शिवसेनेचा भाजपला जोरदार धक्का; अध्यक्षपदी उदयसिंह पाटील-उंडाळकर, तर उपाध्यक्षपदी दीपक चव्हाण बिनविरोध
जिल्हा परिषदेचा वचपा जिल्हा बँकेत! राष्ट्रवादी-शिवसेनेचा भाजपला जोरदार धक्का; अध्यक्षपदी उदयसिंह पाटील-उंडाळकर, तर उपाध्यक्षपदी दीपक चव्हाण बिनविरोध
जिल्हा परिषदेचा वचपा जिल्हा बँकेत! राष्ट्रवादी-शिवसेनेचा भाजपला जोरदार धक्का; अध्यक्षपदी उदयसिंह पाटील-उंडाळकर, तर उपाध्यक्षपदी दीपक चव्हाण बिनविरोध…
सातारा : जिल्हा परिषदेच्या सत्तासंघर्षातील पराभवाचा हिशोब चुकता करत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सत्ताकारणात भाजपला जोरदार धक्का दिला आहे. बँकेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उदयसिंह पाटील-उंडाळकर, तर उपाध्यक्षपदी शिवसेनेचे माजी आमदार दीपक चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडीमुळे जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रातील राजकीय समीकरणांना नवे वळण मिळाले असून, महायुतीमधील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा उघड झाले आहेत.
काही दिवसांपूर्वी झालेल्या सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपने अवघ्या एका मताच्या फरकाने सत्ता मिळवली होती. या सत्तासंघर्षात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांना सत्तेपासून दूर राहावे लागले होते. या पार्श्वभूमीवर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत दोन्ही पक्षांनी एकत्र येत भाजपच्या राजकीय रणनीतीला प्रत्युत्तर दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई आणि मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या एकत्रित भूमिकेमुळे भाजपचे नेते तथा मंत्री जयकुमार गोरे यांच्यासमोरील राजकीय आव्हान वाढल्याचे मानले जात आहे.
निवडणुकीच्या दिवशी सकाळपासूनच जिल्ह्यातील राजकीय हालचालींना वेग आला होता. मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निवासस्थानी भाजपच्या संचालकांची बैठक झाली, तर दुसरीकडे मंत्री मकरंद पाटील यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांनी एकत्रित बैठक घेत पुढील रणनीती निश्चित केली. त्यानुसार अध्यक्षपदासाठी उदयसिंह पाटील-उंडाळकर, तर उपाध्यक्षपदासाठी दीपक चव्हाण यांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. या दोन्ही पदांसाठी विरोधात एकही अर्ज दाखल न झाल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांची बिनविरोध निवड जाहीर केली.
या निवडीमुळे जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रातील दोन अनुभवी नेत्यांच्या नेतृत्वाला नवी संधी मिळाली आहे. दिवंगत सहकारमहर्षी विलासकाका उंडाळकर यांचा राजकीय व सहकार क्षेत्रातील वारसा पुढे नेणारे उदयसिंह पाटील-उंडाळकर हे रयत सहकारी साखर कारखाना आणि कोयना सहकारी बँकेच्या नेतृत्वाची जबाबदारी सांभाळत आहेत. आता सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाची महत्त्वपूर्ण जबाबदारीही त्यांच्याकडे आली आहे.
दुसरीकडे, विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांचे निकटवर्तीय मानले जाणारे फलटणचे माजी आमदार दीपक चव्हाण यांची उपाध्यक्षपदी निवड झाल्याने त्यांच्या राजकीय कारकिर्दीला नवे बळ मिळाले आहे. या निवडीकडे त्यांचे प्रभावी राजकीय पुनर्वसन म्हणूनही पाहिले जात आहे.
एकूणच, जिल्हा परिषद निवडणुकीनंतर जिल्हा बँकेच्या सत्ताकारणातही राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने एकत्रित ताकद दाखवून भाजपला आव्हान दिले आहे. या घडामोडींमुळे जिल्ह्यातील महायुतीच्या राजकारणात नवे सत्तासमीकरण निर्माण होण्याची शक्यता असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि सहकार क्षेत्रातील निवडणुकांवर या बदलांचे पडसाद उमटण्याची चिन्हे आहेत.