Home » Uncategorized » महाबळेश्वरातील ‘सागा रिसॉर्ट’ला अन्न व औषध प्रशासनाचा दणका!

महाबळेश्वरातील ‘सागा रिसॉर्ट’ला अन्न व औषध प्रशासनाचा दणका!

Facebook
X
WhatsApp

लहू चव्हाण, पाचगणी.

महाबळेश्वरातील ‘सागा रिसॉर्ट’ला अन्न व औषध प्रशासनाचा दणका!
अन्न व्यवसाय नोंदणी प्रमाणपत्र निलंबित; तपासणीत १६ गंभीर त्रुटी आढळल्याची नोंद

पाचगणी (महाबळेश्वर) : पर्यटनाची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वर तालुक्यातील मेतगुताड (बोंडारवाडी) येथील ‘सागा रिसॉर्ट’ (Managed by Vyankatesh Group of Hotels) या आस्थापनेवर अन्न व औषध प्रशासनाने कठोर कारवाई केली आहे. रिसॉर्टच्या अन्न व्यवसाय नोंदणी प्रमाणपत्राचे पुढील आदेशापर्यंत निलंबन करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. ऐन पर्यटन हंगामाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या कारवाईमुळे महाबळेश्वर-पाचगणी परिसरातील हॉटेल व्यावसायिकांचे लक्ष वेधले गेले आहे.

तपासणीत स्वच्छतेसह अन्नसुरक्षेतील त्रुटी उघड

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित रिसॉर्टबाबत अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार प्राप्त झाली होती. त्यानंतर अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती प्रि. ना. वाईकर यांनी ३० सप्टेंबर रोजी रिसॉर्टची अचानक तपासणी केली. या तपासणीत स्वच्छता आणि अन्नसुरक्षेशी संबंधित अनेक गंभीर त्रुटी आढळल्याची नोंद करण्यात आली.
स्वयंपाकघरातील खिडक्यांना कीटकप्रतिबंधक जाळ्या नसणे, काच तुटलेल्या अवस्थेत असणे, गंजलेल्या कपाटात तसेच अस्ताव्यस्त पद्धतीने कच्चे अन्नपदार्थ साठवणे, शाकाहारी व मांसाहारी पदार्थांसाठी स्वतंत्र चॉपिंग बोर्ड आणि भांड्यांचा वापर न करणे, अशा बाबी तपासणीत निदर्शनास आल्या.

अन्नसाठवणुकीच्या ठिकाणी झुरळांचा प्रादुर्भाव

तपासणीदरम्यान अन्न साठवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या डब्यांमध्ये आणि भिंतींच्या खाचखळग्यांमध्ये झुरळांचा प्रादुर्भाव आढळल्याची नोंद आहे. उघड्या कचरापेट्या आणि भिंतींची अस्वच्छ अवस्था यांमुळे स्वच्छतेबाबतही प्रश्न उपस्थित झाले.
रिसॉर्टमध्ये कार्यरत चार कर्मचाऱ्यांपैकी दोघांचे वैद्यकीय तपासणी अहवाल उपलब्ध नसल्याचे, कच्चे अन्नपदार्थ पुरवणाऱ्या पुरवठादारांचा तपशील नसल्याचे आणि साफसफाईचे वेळापत्रक उपलब्ध नसल्याचेही तपासणीत आढळले. अशा एकूण १६ गंभीर त्रुटींची नोंद FoSCoS या ऑनलाइन प्रणालीवर करण्यात आली असून, तपासणी अहवाल ओटीपीद्वारे प्रमाणित करण्यात आल्याची माहिती आहे.
कायद्यानुसार नोंदणी प्रमाणपत्र निलंबित
अन्नसुरक्षेच्या दृष्टीने आढळलेल्या त्रुटींची गंभीर दखल घेत सातारा परिमंडळ-१ चे सहायक आयुक्त तथा पदनिर्देशित अधिकारी सं. पां. शिंदे यांनी १ ऑक्टोबर रोजी अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ मधील कलम ३२(३) नुसार रिसॉर्टचे अन्न व्यवसाय नोंदणी प्रमाणपत्र पुढील आदेशापर्यंत निलंबित करण्याचे आदेश दिले.
निलंबनाच्या कालावधीत संबंधित नोंदणीच्या आधारे अन्न व्यवसाय सुरू ठेवल्यास कठोर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. तसेच त्रुटींची पूर्तता करून १५ दिवसांच्या आत अन्न सुरक्षा आयुक्तांकडे अपील करण्याची तरतूद असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

पर्यटकांच्या आरोग्यसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!

महाबळेश्वर आणि पाचगणी परिसरात दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक पर्यटनासाठी येतात. या पर्यटकांना हॉटेल्स आणि रिसॉर्ट्समध्ये सुरक्षित, स्वच्छ व दर्जेदार अन्न मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे अन्नसुरक्षा नियमांचे पालन होत आहे की नाही, याची नियमित तपासणी होणे महत्त्वाचे ठरते.
‘सागा रिसॉर्ट’मधील तपासणीत नोंदवण्यात आलेल्या त्रुटींच्या पार्श्वभूमीवर परिसरातील अन्य हॉटेल्स, रिसॉर्ट्स आणि खाद्यपदार्थ विक्री केंद्रांचीही नियमित तपासणी करण्याची गरज अधोरेखित झाली आहे. पर्यटकांच्या आरोग्याशी संबंधित बाबींमध्ये कोणतीही तडजोड होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Are You Satisfied Panchgani Prime Time ?

Latest News