Home » Uncategorized » बजाज कंपनीचा भोंगळ कारभार; ग्राहकांची फरफट!

बजाज कंपनीचा भोंगळ कारभार; ग्राहकांची फरफट!

Facebook
X
WhatsApp

लहू चव्हाण, पाचगणी.

बजाज कंपनीचा भोंगळ कारभार; ग्राहकांची फरफट!
वाईत दोन शोरूमवर ‘अधिकृत डीलर’चे फलक; खरा डीलर कोण, याबाबत संभ्रम
चार महिने उलटूनही बजाज चेतकचे पासिंग रखडले; प्रमिला चव्हाण यांची ससेहोलपट, ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी…

वाई (प्रतिनिधी) : ‘नाव मोठे आणि लक्षण खोटे’ अशी प्रचिती बजाज कंपनीच्या वाई येथील कारभारामुळे येत असल्याची तक्रार ग्राहकांकडून केली जात आहे. वाईतील सुरूर रस्त्यावर शेजारीच असलेल्या दोन शोरूमवर बजाज कंपनीचे नाव आणि ‘ऑथोराइज्ड डीलर’ असे फलक झळकत असल्याने नेमका अधिकृत डीलर कोण, असा प्रश्न ग्राहकांसमोर निर्माण झाला आहे. कंपनीचा मुख्य डीलर कोण आणि उपडीलर कोण, याबाबत स्पष्टता नसल्याने ग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरण असून, या गोंधळाचा फटका थेट ग्राहकांना बसत असल्याचे चित्र आहे.
वाई येथील स्वामी मोटर्सच्या माध्यमातून प्रमिला चव्हाण यांनी सागर मांढरे यांच्याकडून २९ मे २०२६ रोजी बजाज कंपनीची इलेक्ट्रिक चेतक दुचाकी खरेदी केली होती. वाहन खरेदी केल्यानंतर त्यांना पक्की पावतीही देण्यात आली. मात्र, चार महिने उलटूनही अद्याप वाहनाचे पासिंग झालेले नसल्याने संबंधित महिला ग्राहकाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
या प्रकरणी कंपनीचे व्यवस्थापक विजय घाडगे यांच्याकडे विचारणा केली असता, संबंधित वाहनाच्या पासिंगसाठी आवश्यक असलेली रक्कम कंपनीकडे जमा झाली नसल्याने पासिंग करण्यात आले नसल्याचे त्यांनी सांगितल्याचे समजते. तर दुसरीकडे, सागर मांढरे यांच्याकडे विचारणा केली असता, आपण कंपनीकडे पैसे जमा केले असल्याचे ते सांगत आहेत. त्यामुळे दोघांच्या दाव्यांमध्ये विसंगती दिसून येत असून, नेमकी रक्कम कुठे अडकली आहे, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मुख्य डीलर कोण? ग्राहकांमध्ये संभ्रम

वाईतील सुरूर रस्त्यावर एकाच परिसरात असलेल्या दोन शोरूमवर बजाज कंपनीचे नाव आणि ‘ऑथोराइज्ड डीलर’चे फलक लावण्यात आले आहेत. त्यामुळे यापैकी अधिकृत मुख्य डीलर कोण आणि उपडीलर कोण, हे ग्राहकांना समजणे कठीण झाले आहे. अधिकृत डीलरची ओळख पटविण्यासाठी ग्राहकांनी नेमकी कोणती प्रक्रिया अवलंबावी, याबाबतही संभ्रम आहे. बजाज कंपनीने आपल्या अधिकृत डीलरची माहिती सार्वजनिक करून प्रत्येक शोरूमवर स्पष्ट फलक लावावेत, अशी मागणी ग्राहकांकडून होत आहे.

चार महिने पासिंग रखडल्याने महिलेची फरफट

वाहन खरेदी करूनही पासिंगअभावी ग्राहकाला होणारा त्रास हा गंभीर विषय बनला आहे. वाहनाच्या नोंदणीबाबत स्पष्टता नसल्याने प्रमिला चव्हाण यांना गेल्या चार महिन्यांपासून मनस्ताप सहन करावा लागत आहे. विक्रेता आणि कंपनी व्यवस्थापन यांच्यातील आर्थिक व्यवहाराबाबत परस्परविरोधी माहिती मिळत असल्याने ग्राहकाने न्यायासाठी कोणाकडे दाद मागायची, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
बजाज चेतकसारख्या नामांकित कंपनीकडून ग्राहकांना पारदर्शक सेवा आणि वेळेत वाहन नोंदणीची अपेक्षा असते. मात्र, अशा प्रकारच्या तक्रारींमुळे ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी पसरत असून, याचा कंपनीच्या विश्वासार्हतेवर आणि व्यवसायावरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

कंपनीच्या वरिष्ठांनी तातडीने लक्ष घालण्याची मागणी

बजाज कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची तातडीने चौकशी करून प्रमिला चव्हाण यांच्या वाहनाचे पासिंग पूर्ण करावे, तसेच रकमेच्या व्यवहाराबाबत वस्तुस्थिती स्पष्ट करावी. वाईतील अधिकृत मुख्य डीलर आणि उपडीलर कोण, याची अधिकृत घोषणा करून ग्राहकांचा संभ्रम दूर करावा. भविष्यात अशा प्रकारच्या तक्रारी उद्भवू नयेत, यासाठी कंपनीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्राहकांकडून जोर धरू लागली आहे.
ग्राहकांना होणारी गैरसोय थांबवून या प्रकरणावर तातडीने तोडगा काढण्याची अपेक्षा व्यक्त होत असून, बजाज कंपनीचे वरिष्ठ व्यवस्थापन याबाबत काय भूमिका घेते, याकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Are You Satisfied Panchgani Prime Time ?

Latest News