Last Updated:
पीडित कृष्णा मुंडे हे परळी शहरात असताना क्षुल्लक कारणावरून काहींशी त्यांचा वाद झाला.
बीड : परळी शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. भाजपचे गटनेते तथा सभापती पवन मुंडे यांचे पुतणे कृष्णा मुंडे यांच्यावर तब्बल 16 ते 17 जणांच्या टोळक्याने भरदिवसा धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. केवळ फोनवर बोलण्याच्या अत्यंत क्षुल्लक कारणावरून हा हल्ला करण्यात आल्याचे समोर आले असून, या घटनेमुळे परळी शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित कृष्णा मुंडे हे परळी शहरात असताना क्षुल्लक कारणावरून काहींशी त्यांचा वाद झाला. केवळ फोनवर बोलण्याच्या बाचाबाचीचे रूपांतर भीषण संघर्षात झाले. पाहता पाहता 15 ते 17 जणांच्या टोळक्याने कृष्णा मुंडे यांना घेरले आणि त्यांच्यावर लोखंडी रॉड व धारदार शस्त्रांनी भीषण हल्ला चढवला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
कृष्णा मुंडे यांची प्रकृती स्थिर
या हल्ल्यात कृष्णा मुंडे हे गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.
पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया
घटनेची माहिती मिळताच परळी शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. याप्रकरणी पीडित कृष्णा मुंडे यांच्या तक्रारीवरून व प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार परळी शहर पोलीस ठाण्यात 16 ते 17 संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलीस परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेज तपासत असून आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.
बीडमध्ये गुंडाराज थांबणार कधी?
भरदिवसा शहरात अशा प्रकारे टोळक्याने येऊन एका तरुणावर प्राणघातक हल्ला केल्यामुळे परळीतील नागरिकांमध्ये भीतीचे आणि संतापाचे वातावरण आहे. लोकप्रतिनिधींच्या नातेवाइकांवरच जर अशा प्रकारे खुलेआम हल्ला होत असेल, तर सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचे काय? असा सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत. शहरातील वाढत्या गुन्हेगारीला वेसण घालून दोषींवर कडक कारवाई करावी, अशी जोरदार मागणी परळीकरांमधून केली जात आहे.
हे ही वाचा :
