अहिल्यानगर : प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर हिचे वडील आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे माजी प्रादेशिक अधिकारी दिलीप कोंडीबा खेडकर आता पुन्हा एकदा चर्चेत आल आहे. दिलीप खेडकर यांच्या पाथर्डी तालुक्यातील भालगाव येथील घरावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने छापा टाकला. या कारवाईमध्ये १३.३० कोटींची बेहिशेबी मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. नाशिक आणि अहिल्यानगर एसीबीच्या पथकांनी एकाचवेळी विविध ठिकाणी ही कारवाई केली. तब्बल ३० हून अधिक अधिकारी-कर्मचारी या कारवाईत सहभागी झाले होते.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे निवृत्त प्रादेशिक अधिकारी दिलीप कोंडीबा खेडकर आणि त्यांच्या पत्नी मनोरमा दिलीप खेडकर यांच्याविरोधात बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. उत्पन्नाच्या ज्ञात स्रोतांपेक्षा तब्बल १०२ टक्के अधिक मालमत्ता संपादित केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दिलीप खेडकर हे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळात प्रादेशिक अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांच्या मालमत्तेची उघड चौकशी करण्यात आली. या चौकशीत त्यांच्या उत्पन्नाच्या ज्ञात स्रोतांपेक्षा १०२ टक्के अधिक मालमत्ता संपादित केल्याचे निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी म्हटलंय.
या प्रकरणी दिलीप खेडकर आणि त्यांच्या पत्नी मनोरमा खेडकर यांच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ च्या कलम १३(१)(ब), १३(२) तसेच भारतीय दंड संहितेच्या कलम १०९ अन्वये अहिल्यानगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस ठाण्यात २९ सप्टेंबर २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपअधीक्षक अजित फुपटे करीत आहेत. पोलीस निरीक्षक सविता तांबे यांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण केली. दरम्यान, बेहिशोबी मालमत्तेच्या या प्रकरणामुळे अहिल्यानगरच्या प्रशासकीय वर्तुळात चर्चेला सुरुवात झाली आहे.
दिलीप खेडकर आणि त्यांच्या पत्नी मनोरमा खेडकर यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १९९५ ते डिसेंबर २०२३ या कालावधीतील उत्पन्न, खर्च आणि मालमत्तेची चौकशी केल्यानंतर एसीबीने हा गुन्हा दाखल केला आहे. एफआयआरनुसार, खेडकर कुटुंबाचे या कालावधीतील ज्ञात उत्पन्न १३ कोटी २ लाख ७८ हजार ७७५ रुपये, तर खर्च १५ कोटी ३३ लाख ७४ हजार ८५५ रुपये असल्याचे नमूद आहे. ज्ञात मालमत्तेचं मूल्य १० कोटी ९९ लाख ८५ हजार ६१६ रुपये असल्याचेही एफआयआरमध्ये नमूद करण्यात आलंय.
उत्पन्नाच्या ज्ञात स्रोतांच्या तुलनेत मालमत्ता आणि खर्चातील तफावत १३ कोटी ३० लाख ८१ हजार ६९६ रुपये म्हणजेच ज्ञात उत्पन्नाच्या सुमारे १०२ टक्के अधिक असल्याचा एसीबीचा दावा आहे. त्यानंतर मंगळवारी पहाटे नाशिक आणि अहिल्यानगर एसीबीची पथकं भालगावमध्ये दाखल झाली. खेडकर यांच्या घरासह संबंधित मालमत्तांवर कागदपत्रे, आर्थिक व्यवहार, बँक खाती आणि मालमत्तेशी संबंधित नोंदींची तपासणी करण्यात आली.
एफआयआरमध्ये पुण्यातील बाणेर परिसरातील मालमत्ता, फ्लॅटचे बांधकाम, फर्निचर, वाहनांची खरेदी-विक्री आणि देखभाल, शिक्षण, विमा तसंच विविध बँक व्यवहारांचा उल्लेख आहे. बाणेर रोडवरील फ्लॅटच्या बांधकामासह फर्निचर आणि वस्तूंसाठी ७० लाख ३८ हजार ६२४ रुपयांचा खर्च नमूद करण्यात आला आहे. या प्रकरणात १२७ आर्थिक नोंदींच्या आधारे उत्पन्न, खर्च आणि मालमत्तेची पडताळणी करण्यात आल्याचे एफआयआरमध्ये नमूद आहे.
या प्रकरणाच्या चौकशीला यापूर्वीपासूनच पार्श्वभूमी असल्याचं समोर आलंय. अहिल्यानगर येथील पंढरीनाथ शंकर साबळे यांनी २०१२ मध्ये तक्रार केल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. दरम्यान, छाप्यात नेमकी कोणती कागदपत्रे किंवा साहित्य जप्त करण्यात आले, याचा अधिकृत तपशील अद्याप समोर आलेला नाही. या कारवाईत कोणालाही अटक किंवा ताब्यात घेतलेले नाही. एसीबीचे पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपुटे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
दिलीप खेडकर हे प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचे वडील आहेत. पूजा खेडकर यांच्या प्रशासकीय सेवेशी संबंधित वादानंतर खेडकर कुटुंब चर्चेत आले होते. आता बेहिशोबी मालमत्ता आणि उत्पन्न-खर्चातील कथित तफावतीच्या प्रकरणात एसीबीने गुन्हा दाखल करून छापा टाकल्याने पाथर्डी तालुक्यात या कारवाईची जोरदार चर्चा सुरू आहे
